धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध
भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे. गावाजवळच एका खडकाळ शेतात चालुक्यकालीन कलेचा अप्रतिम अविष्कार असलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे धर्मापुरीतील जतन केलेले असे एकमेव मंदिर होय. नुकतेच या मंदिराचा पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धार करण्यात आला. अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे केदारेश्वर मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने बांधल्याची नोंद आढळून येते. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या जंघा भागावर आकाराने पुष्ट असलेल्या शैव-वैष्णव तसेच शक्तांची मिळून एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील मंदिराच्या पश्चिम पूर्व कोपऱ्यात अर्थात अग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडून अनुक्रमे आठव्या क्...