मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा
मातृत्व ही केवळ निसर्गाची देणगी नसून ती सृष्टीतील सर्वात कोमल, पवित्र आणि निःस्वार्थ भावना आहे. आईच्या कुशीतूनच माणूस प्रथम प्रेम, सुरक्षितता आणि जिव्हाळा अनुभवतो. म्हणूनच भारतीय शिल्पकलेत मातृभावाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. धारासूर येथील गुप्तेश्वर शिव मंदिर येथे कोरलेले हे “मातृशिल्प” त्या वात्सल्यभावनेचे अत्यंत जिवंत आणि दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. दगडामध्ये साकारलेले हे शिल्प पाहताना कलाकाराने केवळ शरीर कोरले नाही, तर भावनांनाही श्वास दिला आहे, याची प्रचिती येते. या शिल्पात माता आपल्या बालकाला प्रेमाने कुशीत घेत आहे. तिच्या हातातील अलगद स्पर्श, बाळाला धरून ठेवण्याची सुरक्षितता आणि चेहऱ्यावर उमटलेला वात्सल्यपूर्ण भाव अत्यंत प्रभावी आहे. परंतु या शिल्पातील सर्वात विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे माता बाळाच्या ओठांचे चुंबन घेताना दाखवलेली आहे. भारतीय मंदिरशिल्प परंपरेत माता-बालक दृश्ये अनेक ठिकाणी दिसतात, परंतु अशा प्रकारचा “लिप-किस” अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे हे शिल्प केवळ कलात्मक नसून भावविश्वाच्या अभिव्यक्तीचेही अद्वितीय उदाहरण ठरते. या दृश्यात...