" वो बुलाती हैं मगर जानेका नहीं "
“वो बुलाती हैं मगर जाने का नहीं...” कधीतरी ऐकलेली ही ओळ आज अक्षरशः जगलो. माणकेश्वरकडे निघालो होतो. वाटेत धर्मापुरी आली, पण ठरले होते, थांबायचे नाही. वेळ वाया जाऊ नये, कारण हे मंदिर आधीच पाहिलेले. परंतु मनाच्या खोलवर कुठेतरी त्या मंदिरावरील पत्र लेखिका नायिका पुन्हा एकदा आपल्याला हाक मारत होती. तिच्या शिल्पातील माधुर्य, तिचा आत्मीय भाव, सर्व काही मनात कोरलेलेच होते. देशभरातील असंख्य शिल्पे पाहिली, पण धर्मापुरीतील ती नायिका मात्र अविस्मरणीय. तिचा कमनीय बांधा, त्रिभंगातील सहजता, पाठीवरील पन्हाळाचे सौंदर्य, उन्नत स्तनमंडळ आणि पृथुल नितंब — जणू शिल्पकाराने दगडाला नव्हे तर श्वासालाच आकार दिला आहे. तिचे केस — हलक्या वळणांचा मनमोहक बुचडा, ज्यातून काही बटा कपाळावर नाचत होत्या. गळ्यात माळांचे सौंदर्य, कमरेभोवती वलय घालणारी मेखला, गळ्यातून ओघळत कमरेवर विसावणारी सोनसाखळी जणू प्रकाशरेषा तिच्या देहावरून झेपावत होत्या. हातातील कडे तिच्या लेखणीच्या हालचालीत लय निर्माण करीत होते, तर पायातील पैंजण आणि पादजालक तिच्या ठेक्याचा सुर ऐकवत होते. ही नायिका म्हणजे लावण्य आणि ल...