" वो बुलाती हैं मगर जानेका नहीं "
“वो बुलाती हैं मगर जाने का नहीं...”
कधीतरी ऐकलेली ही ओळ आज अक्षरशः जगलो.
माणकेश्वरकडे निघालो होतो. वाटेत धर्मापुरी आली, पण ठरले होते, थांबायचे नाही.
वेळ वाया जाऊ नये, कारण हे मंदिर आधीच पाहिलेले.
परंतु मनाच्या खोलवर कुठेतरी त्या मंदिरावरील पत्र लेखिका नायिका पुन्हा एकदा आपल्याला हाक मारत होती.
तिच्या शिल्पातील माधुर्य, तिचा आत्मीय भाव, सर्व काही मनात कोरलेलेच होते.
देशभरातील असंख्य शिल्पे पाहिली, पण धर्मापुरीतील ती नायिका मात्र अविस्मरणीय.
तिचा कमनीय बांधा, त्रिभंगातील सहजता, पाठीवरील पन्हाळाचे सौंदर्य, उन्नत स्तनमंडळ आणि पृथुल नितंब — जणू शिल्पकाराने दगडाला नव्हे तर श्वासालाच आकार दिला आहे.
तिचे केस — हलक्या वळणांचा मनमोहक बुचडा, ज्यातून काही बटा कपाळावर नाचत होत्या.
गळ्यात माळांचे सौंदर्य, कमरेभोवती वलय घालणारी मेखला, गळ्यातून ओघळत कमरेवर विसावणारी सोनसाखळी जणू प्रकाशरेषा तिच्या देहावरून झेपावत होत्या. हातातील कडे तिच्या लेखणीच्या हालचालीत लय निर्माण करीत होते, तर पायातील पैंजण आणि पादजालक तिच्या ठेक्याचा सुर ऐकवत होते.
ही नायिका म्हणजे लावण्य आणि लय यांचा साक्षात् संगम!
गाव जवळ येऊ लागले तसेच मनात कुजबुज उठली “फक्त दोन फोटो घेऊ या...”
सकाळची वेळ, आकाशात हलकेसे ढग, आणि सोनेरी ऊन वातावरणात जणू शांत उत्सव भरला होता.
गाडी वळवली, स्टँड काढला, आणि त्या नायिकेचे छायाचित्रण सुरू केले.
प्रत्येक क्लिकसोबत तिच्या अलंकारांतील झळाळी आणि देहरेषांतील संगीत उमटत होते.
कधी ती पत्र लिहिताना भासे, कधी स्वतःशी संवाद साधताना...
आणि मनात कुणाचा तरी हळू आवाज ऐकू आला —
“ओ सर... थांबा ना! एवढ्यात पुन्हा भेटणार नाही...”
वीस-पंचवीस छायाचित्रे घेतली, आणि मन भरून आले. सकाळच्या कोवळ्या किरणांनी त्या शिल्पाला स्पर्श केला तेव्हा वाटले, ही क्षणांची नव्हे, शतकांची साक्ष आहे.
मी शांतपणे म्हणालो, “तू पुन्हा भेटलीस... आणि यावेळी मी थांबलो, कारण तुझी हाक टाळणं माझ्या हातात नव्हतंच.”
लवकरच ती छायाचित्रे फ्रेममध्ये सजतील आणि घरात विराजमान होतील त्या अनाहूत पण मोहक हाकेला उत्तर म्हणून.
मला पत्र लेखिका आणि दर्पणा नायिका नेहमी ओ सर म्हणून हाक मारत असल्याचा भास होतो. 😊
डॉ अरविंद सोनटक्के
मूर्तिशास्त्र अभ्यासक
Comments
Post a Comment