चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार

"प्रेमाची सुरुवात ही ओठांपासून होते." अगदी काही मिनिटे पूर्वी जन्मलेल्या बाळाचे ही प्रेमपूर्वक चुंबन घेतले जाते. प्रेम व्यक्त करण्याचे एक सहज सुलभ मार्ग म्हणजे चुंबन होय. मग ते आई-मुलांचे, वडील-मुलांचे, आजी-नातवाचे किंवा भावा-बहिणी सोबत, पती-पत्नी वा प्रियकर- प्रेयसी असो; जिथे निशब्द प्रेम व्यक्त करायचे असते. तिथे चुंबन हे एकमेव मार्ग आहे. ओठ हे शरीरातील सर्वात संवेदनशील अंग आहे. याच्या उपयोगाने आणि कामशास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास 'चुंबन' हे नायक-नायिकेचा कामभाव जागृत करण्याचे साधन असून, प्रेम प्रदर्शनाचे निमित्त होय. याचा प्रयोग करतांना एकमेकांच्या मनोवृत्तीचा विचार करुनच केला पाहिजे. चुंबनाच्या अनेक प्रकारा पैकी काळाचे वेळेचे भान ठेवूनच त्यांचा प्रयोग केला पाहिजे, असे शास्त्र सांगते. चुंबन हे नायक / नायिकेच्या कोणत्या अंगाचे घेतले पाहिजे हे एकमेकांची आवड व स्वभाव लक्षात घेऊनच झाले पाहिजे. या संदर्भात शास्त्रानेही काही मार्गदर्शन केले आहे. या व्यतिरिक्त ज्यांना त्यांना जे आवडेल त्याचा स्विकार करावा. शास्त्र म्हणून विवेचन करतांना गृहय-अगृहय सर्व प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातील गृहय गोष्टीचीच निवड करावी. जे स्थान कामोत्तेजक आहेत, सौंदर्यामुळे आकर्षक वाटतात अशाच स्थानांचे चुंबन घेतले जाते. 
चुंबन विधी हा आजच्या प्रमाणे वैदिक साहित्यात नव्हता. चुंबनाच्या जागी तेथे 'हुंगणे' हे प्रारंभिक रुप होते. श्वास हा प्राणप्रतीक असल्याने बाहेरगावी जातांना किंवा परत आल्यावर पित्याने आपल्या मुलाच्या डोक्यावर श्वास सोडून (त्याला प्राणदान) देण्याची प्रथा होती. हर्षाचा पिता हर्षाच्या डोक्यावर श्वास टाकतो, असा उल्लेख 'हर्षचरित्रम्' मध्ये येतो. अमेरिकेतील टेक्सास या राज्यातील मानववंशशास्त्रज्ञ वाघन ब्रायंट यांनी असे मत व्यक्त केले आहे की, चुंबन ही कामक्रीडा पहिल्यांदा भारतात सुरु झाली. इ. स. पू. १५०० वर्ष पूर्वी भारतीयांनी चुंबन ही कला ज्ञात होती. वैदिक साहित्यातील चारही वेदात चुंबनाचे उल्लेख येतात, त्यानंतर ग्रीकांनी ही कला भारतीयांकडून आत्मसात केली. तद्नंतर युरोप व अशियात या कलेचा प्रसार झाला. अर्थात सुरुवातीला नाकावर नाक घासने या पुरतेच हे मर्यादीत होते. त्यानंतर महाभारतात ओठांचे चुंबन तर कामसूत्रात उत्तेजीत चुंबनाचे उल्लेख येतात. याचा अर्थ चुंबन हे वैदिक काळापासूनच होते. ज्याचे रुपांतर कालानुक्रमे आजच्या विधीयुक्त चुंबनात होत गेले.

महर्षी वात्स्यायन यांच्या कामासूत्र या ग्रंथा नुसार केस, कपाळ, गाल, डोळे, छाती, स्तन, खालचे ओठ, तोंडातील भाग हे चुंबनाचे स्थान सांगितले आहेत.  
रतिरहस्य या कामशास्त्रीय ग्रंथानुसार :-

"नथनगलकपोल दन्दवासो मुखान्तः 
स्तनयुगलललाट चुंबनस्थानमाहुः ।।"

डोळे, गळा, गाल, ओठ, टाळू, दोन्ही स्तन, मस्तक हे चुंबनाचे स्थान म्हणून दिले आहे. यात गळा हे स्थान अधिकचे असून, वात्सायनानुसार 'छाती' उल्लेखिलेली नाही.

पंचसायकः नुसार :-
गण्डस्थलीमस्तकदन्तवासोग्रीवाकुचोरस्तन चूचुकानि l 
आलिंगनानन्तरमेव यूनो: स्थनानि चुंम्बस्य वदन्ति तज्ज्ञाः ।। 
मस्तक, ओठ, मान, स्तन-मंण्डल, स्तनाग्र ही चुंबनाची स्थाने सांगितलेली आहेत, यात कामसूत्रापेक्षा मस्तक, स्तनाग्र हे स्थान वेगळे दिले आहेत तर केस, गाल, डोळे व तोंडातल्या आतील भाग (जीभ) हे दिलेले नाहीत.

अनंगरंगनुसार :-
'अधराक्षिकपोलमस्तकं वदनान्त: स्तनयुग्मकन्थरे
विहितानि पदानि पण्डितैः परिरम्भादनु चुम्बनस्य हि ।।'
ओठ, डोळे, गाल, मस्तक, तोंडातील भाग, दोन्ही स्तन आणि मान हे चुंबनाचे स्थान दिलेली आहेत, यात कामसूत्रापेक्षा केस, कपाळ, गाल, छाती, हे स्थान दिलेले नाहीत.

कामसूत्र, पंचसायकः व अनंगरंग हे नमूनारुपाने तीन शास्त्रांचा अभ्यास केल्यास आणि तिघांचा सार काढल्यास मस्तक, गाल, नेत्र, वृक्ष:स्थल, स्तनाग्र, ओठ, तोंडातील भाग, गळा, मस्तक ही स्थळे चुंबनाची आहेत. 

कामसूत्रात अनेक प्रकारच्या चुंबनाचे विवेचन आलेले आहे. ज्यानुसार, 
अ) कुमारीकांचे तीन प्रकारचे चुंबन (कुमारिका याचा अर्थ अविवाहीताच नसून विवाहीत स्त्रियाही येतात परंतु त्या स्त्रिया ज्यांचा अजून समागम झालेला नाही)
आ) प्रौढ व्यक्तींचे चार प्रकारचे चुंबन ज्यात दोघांचाही कामभाव जागृत होतो. ज्याचा प्रयोग विभिन्न परिस्थितीत केला जातो.
इ) प्रौढांचे असे चुंबन वेगवेगळ्या स्थितीत नसल्याचेच जमा असून त्याचा उपयोग केवळ सहवास किंवा समागम दरम्यानच होतो.
ई) वरच्या ओठांचे चुंबन.
उ) खालच्या व दोन्ही ओठांचे चुंबन.
ऊ) तोंडाच्या आतील भागाचे चुंबन.
ए) चेहऱ्याच्या विविध अंगाचे चुंबन.
ऐ) विशिष्ट प्रसंगाचे चुंबन.

साधारणतः असे ८ प्रकारचे चुंबनाचे वर्णन असून त्यातही अनेक प्रकार आहेत. ही चुंबने काळ, स्थळ व देशस्वभावानुसार वेगवेगळी आहेत. नैषधीय चरित्रानुसार तर चुंबन रात्री केले पाहिजे असा उल्लेख सापडतो. दिवसा चुंबन घेणे निषध्द होते. राजा नल त्याची प्रिया दमयन्ती रुसल्यावर तिची जवळची मैत्रीण 'कला' हिस म्हणतो, "आपल्या मैत्रीणीला सांग की बिच्याऱ्या दिवसाच्या गुन्हयाला क्षमा कर, कारण रात्रीसाठीच 'निशी- चुंबने' हा शब्द वापरतात.
"क्षन्तु मन्तु दिनस्यास्य वयस्येयं व्यवस्यतात् । 
निशीव निशि-धात्वर्थ यदाचरति नात्र नः॥ 
(नं.च. सर्ग २० श्लोक ५४)

वात्सायनाने लाट देशातील लोक जंघा व स्त्रीजननेंद्रियांचे व नितंबाचे चुंबन घेतात असा उल्लेख केलेला आहे. त्यानुरुप श्रीहर्षने नैषधीय चारित्रात कपडयाद्वारे चुंबनाचा प्रकार नळ च्या वक्तव्यातून व्यक्त केला आहे, "प्रिये सुताच्या धाग्यापासून बनलेले तुझे हे वस्त्र एक परम गुणशाली पुरुषाप्रमाणे तुझे नितंब, जंघांचे चुंबन घेत तुझ्या स्तनाला अलिंगन देत आहे. ते त्याच्या परम सौभाग्याला अनुकूल आहे

यच्चुम्बीत नितम्बोरु यदालिंगतिच स्तनौ । 
भुंक्ते गुणमयं तत्ते वास: शुभदशोचितम ।।
(नै. च. सर्ग २० श्लोक १४८)

आनंदाच्या अदान- प्रदानासाठीचे माध्यम म्हणूनही आपण चुंबन, नखक्षत, दतक्षत व संभोगाकडे पाहू शकतो. यात स्त्री व पुरुष सर्वस्व अर्पन करतात. हे आत्मसमर्पन दोघांसाठी ही आनंद वर्धक ठरणारे आहे. हे केवळ इंद्रीय सुख नसून त्यागाचेही प्रतीक ठरते. ज्यात आत्मसमर्पन, आत्मबलीदानही आहे आणि हाच फरक पशु व मानव यांच्यात आहे. म्हणूनच आनंदासाठी आनंद या संकल्पनेतून वावरले पाहिजे. त्याच हेतू आणि दृष्टीने बाह्य रतिक्रिडेकडे पहिले पाहिजे. अशा या बाह्यारतीतील चुंबनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.
१. निमित्तक चुंबन

पाहिलेंदा पती लज्जाशिल पत्नीला आपल्या ओठाचे चुंबन घेण्यास भाग पाडतो, तेंव्हा ती ओठांची हालचाल न करता केवळ ओठांवर ओठ टेकविते त्यास वात्सायणाने 'निमित्तक' चुंबन म्हटले आहे. 

२. स्फुरितक चुंबन

पतीने प्रथम चुंबन घेतल्यावर नववधूचे ओठ पतीचे पुनः चुंबन घेण्यासाठी स्फुरण पावतात, परंतु परंपरागत स्वाभाविक लज्जेमुळे ती ओठ स्फुरत असूनही चुंबन घेत नाही. अर्थात अशा वेळी पती तिच्या स्फुरण पावणाऱ्या ओठांचे जे चुंबन घेतो त्यास कोक्कोने 'स्फुरित' चुंबन म्हटले आहे. 

३. घ‌ट्टितक चुंबन

संभोगाचा काहीसा अनुभव आल्यानंतर आपल्या मुखात ती पतीचे ओठ पकडते. पण लाजून आपले डोळे मिटून घेते व एक हात आपल्या पतीच्या ही डोळ्यावर ठेवून जीभेच्या टोकाने त्याचे ओठ रगड़ते या प्रकारास 'घ‌ट्टितक' चुंबन म्हणतात. 

४. मिलित चुंबन

तरुण नायक नायिकेच्या चेहऱ्याला पकडून जबरदस्तीने चुंबन घेत असल्यास ते 'मिलित' चुंबन होय. 

५. सम चुंबन

या चुंबनात पती-पत्नी एकमेकांसमोर तोंड करुन एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतात. यास सम चुंबन म्हटले जाते.
६. तिर्यक चुंबन

पती-पत्नी थोडेसे तोंड वळवून ओठांचे चंबू करुन एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेणे यास कामसूत्रात 'तिर्यक चुंबन' असे म्हटलेले आहे. परंतु रतिरहस्यात या चुंबनाच्या स्थिती विषयी मतभिन्नता दिसून येते. त्यानुसार, ज्यावेळी प्रियकर प्रियेच्या मागे उभा राहून व तिची हनुवटी धरुन तिचे तोंड आपल्या हाताने वर वळवून तिचे चुंबन घेतो. तेंव्हा स्त्रीची उंची कमी झाल्याने त्याला मान वाकवाविच लागते म्हणून या चुंबनाच्या प्रकारास 'तिर्यक चुंबन' असे म्हणतात. रतिरहस्य व अनंगरंगात नायिकेच्या मागे बसून तोंड वळवून घेतलेले चुंबनाला तिर्यंक चुंबन म्हटले आहे. याचा अर्थ कामसूत्रात दिलेल्या तिर्यक व उद्घान्त चुंबनाचे यांनी एकत्रीकरण केलेले दिसते. 

७. उद्घान्त चुंबन

या प्रकारात दोघांपैकी एकाने दुसऱ्याच्या पाठीमागे बसून त्याची / तिची हानूवटी हाताने धरुन आपल्या दिशेने वळवून ओठांचे चुंबन घेतले जाते.

८. अवपीडितक आणि पीडित चुंबन

सम, तिर्यक, उद्घांत हया तीनही प्रकारच्या चुंबनात जेंव्हा अतिजोराने ओठ दाबले जातात, रगडले जातात. तेंव्हा त्यास 'अवपीडितक' चुंबन म्हणतात. 
९. निपीडत चुंबन

काम जागृत करणाऱ्या अनेक नाडीचे वैज्ञानिक संदर्भ पद्मश्रीने दिलेली आहेत व ती यथार्थ ही आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे, मदननाडीला उत्तेजीत करण्यासाठी छाती, स्तन व नाभी प्रदेश दाबत नायक जे चुंबन घेतो त्यास 'निपीडत' चुंबन असे म्हणतात.

१०. छलितक चुंबन व बोधित चुंबन

झोपलेल्या नायकाला जागे करण्यासाठी केलेले चुंबन तसेच असावधान नायक, विवादात मग्न नायक किंवा इतर विषयात बोलण्यात मग्न नायकाचे विषयांतर करणे किंवा त्याचा विषय भेद करुन कामभाव जागृत करण्यासाठी घेतलेले चुंबन होय. पहिल्या प्रकारात नायकाला केवळ जागे करणे हा हेतू तर दुसऱ्या प्रकारात त्याचा विषय बंद करणे, त्यासोबतच त्याला कामातूर बनविणे या दोन्हींचा समावेश होतो. नायकाच्या येण्यापूर्वी नायिका जर झोपली असेल तर तिला जागे करण्यासाठी नायकाने केलेल्या चुंबनाला 'बोधित चुंबन' म्हणतात. तसेच जाणूनबुजून, मुद्दाम नायिका नाटक करीत, आपल्या बद्दलचा प्रेमभाव पहाण्यासाठी झोपली असेल तर त्यावेळी नायकाने घेतलेल्या चुंबनाला 'नायिका चुंबन' म्हणतात. 

भारतीय काव्यातील सर्वच उदाहरणे येथे देणे शक्य नाही परंतु कामशास्त्रकारांच्या चुंबनाचे साहित्यकारांनी आपल्या साहित्यात सुंदर वर्णन केलेले दिसते. जसे, 

मैं मिसहा सोयो समुझि, मुँहु चूम्यौ ढिग आइ ।
हँस्यौ खिसानी गल गहयौ, रही गरै लपटाइ ।। - बिहारी सत्तसई 
(जेंव्हा त्याने समागमाची इच्छा व्यक्त केली तेंव्हा माझ्या नकाराने युक्ती करुन तो पलंगावर झोपला, तेंव्हा तो झोपला आहे. असे समजून त्याच्या जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले, एवढ्यात तो हसायला लागला वास्तविकता लक्षात आल्याने मी खजील झाले, तेंव्हा त्याने मला अलिंगन दिले. मी ही त्याच्या अलिंगणात रात्रभर राहिले.)
इतर कामशास्त्रीय ग्रंथात नसलेली काही चुंबनाचे प्रकार नागरसर्वस्वम् मध्ये सांगितले आहेत ती पुढील प्रमाणे आहेत.

११. भ्रमित आणि उन्नामित चुंबन

जेंव्हा प्रियकर आपला चेहरा फिरवत प्रियाच्या मस्तकाचे व अधरोष्ठाचे चुंबन घेतो त्यास 'भ्रमित' व स्वतःचे ओठ समोर करुन दोन्ही डोळे व गालांचे चुंबन घेतो त्यास 'उन्नामित' चुंबन म्हणतात.

१२. संहितोष्ठ चुंबन

छाती, जंघा व त्याभोवतालची जागा दोन्ही ओठ जोडून घेतलेले चुंबन म्हणजे 'संहितोष्ठ' चुंबन होय.

१३. वैकृतक आणि नतगण्ड चुंबन

तोंड फिरवून गळा, गाल व स्तनाचे चुंबन घेतले जाते त्यास वैकृतक व चेहरा खालीकरुन दोन्ही गालासह समस्त शरीराचे जे चुंबन घेतले जाते त्यास नतगण्ड चुंबन म्हणतात.
१४. जिव्हा युध्द चुंबन

जिभेचे वेगवेगळे प्रकार करुन घेतलेले चुंबन यात सांगितले आहेत. ज्यानुसार जिभेचा समोरील भाग लहान करुन त्यास टोकदार बनवून त्यास तोंडात प्रविष्ठ करुन घेतलेल्या चुंबनाला जिव्हा चुंबन म्हणतात, तसेच जिभ मध्ये प्रविष्ठ केल्यानंतर ती पसरवली गेल्यास त्यास 'प्रतता' म्हणतात व जिभ तोंडात कंपन केल्यास त्यास 'वाकली' म्हणतात. यास घंटिक, घृष्ट, रसना युद्ध अशीही नावे आहेत. हे चुंबन सर्वांना आवडते असे असे काही नाही. 
महाकवी कालिदासाने शिव आणि पार्वतीच्या प्रणयाचे सुंदर व प्रभावशाली वर्णन केलेले आहे.

यन्मुखग्रहणमक्षताधरं दानमव्रणपदं नखस्य यत् ।
यद्रतं च सदयं प्रियस्य तत्पार्वती विषहते स्ननेतरत् ।। (कुमार संभव ८/९)

जेंव्हा शंकर चुंबन घेताना दंतक्षत करत नव्हते किंवा नखक्षत करीत नव्हते अत्यंत दयापुर्वक समागम करीत होते, त्या रतिक्रीडेला पार्वती पसंती देत होती. इतर क्रीडेला नाही. असेच वर्णन गीतगोविंद मध्ये ही आढळतात. 

१५. पैज (द्यूत) चुंबन

चुंबनही पैज लावून घेतले पाहिजे. हा पैज चुंबनाचा प्रकार आहे. नायक-नायिकेमध्ये जो कोणी दुसऱ्याचे ओठ अगोदर पकडेल त्याचा विजय होईल अशा तऱ्हेची पैज लावून चुंबनाचा आनंद वाढविला पाहिजे. कधी-कधी या पैजेत स्त्री हारली तर तिने कलह (संघर्ष) करावा. पतीला दूर लोटावे, दुसरीकडे तोंड करुण झोपून रहावे आणि पुन्हा पतीने दुसऱ्यांदा पैज लावावी. दुसरेंदा ती हारली तर तिने जास्त लटका राग आणावा. तसेच बेसावध पतीचे अचानक चुंबन घेऊन त्यास चिडवावे. आपल्या विजयाचे प्रकटन उच्च स्वरात करावे. विजयावर उन्मत्त हसावे, नायकाला आव्हान द्यावे, त्याच्या पुरुषार्थाला आव्हान द्यावे. यात चुंबनाचा आनंद वर्धिष्णू करावा, यामुळे मीलनाची लज्जत आणखीन वाढते. यात कोणीही पराभूत झाले तरी विजय मात्र दोघांचाही होतो. हा कलह अति होता काम नये, अन्यथा समागम आनंदा ऐवजी दुःख ही निर्माण होऊ शकते. ही पैज दोन प्रकारे असू शकते एक निष्कपट व दुसरी कपटद्यूत. यात सहज व युक्ती हे दोन प्रकार होतात. या पैकी कोणताही प्रकार वापरला तरी शेवटी कामोद्दीपन हा हेतू साध्य होतो व दोघांचा एकमेकात चांगलाच रस निर्माण होतो.

अलिंगन व चुंबनाची पैज साहित्यातही सहज पहावयास मिळते. एवढेच काय वेदव्यासांनी पण याचा उल्लेख महाभारतात केलेला आहे. अनिरुध्द आणि उषाच्या संदर्भात म्हणतात,

"दीव्यन्तमक्षैः प्रियया ऽ भिनृण्मया, तदंगसंगस्तनकुंकुमस्त्रजम् । 
बहोर्दधानं मधुमल्लिकाश्रितां तदाग्रमासीनमवेक्ष्य विस्मितः ।। "

बाणासूर राजकुमारीच्या महालात जाऊन पहातो तो काय महालात एक अद्वितीय सुंदर पुरुष, तिच्या सोबत फासे (द्यूत) खेळत होता. तो खेळ केवळ खेळ नाही; परंतु त्याच्या विजयाचे व पराभवाचे सुंदर रुप त्याच्या शरीरावर अंकित आहेत, म्हणजे पैजेवर विजया प्रित्यर्थ अंग-संग लावण्यात आलेले आहे. यातून राजकुमारीच्या स्तनावर लावलेला गंध आणि छातीवर लोंबणारे हार त्याच्या शरीरावर लागलेले आहेत. तसेच उषाने हाताला बांधलेले चमेलीचे गजरे त्याच्या हाताला लपेटलेले आहेत. एवढ्या विजयानंतरही तो खेळ समोर चालू आहे. म्हणजे रतिक्रीडा किंवा बाह्यरत साठी ही पैजा लावणे सामान्य होते. आजही एकांतात हा कलह सर्वमान्य दिसतो.
१६. ओष्टविमृष्ट आणि चुम्बितक चुंबन

जिभेच्या केवळ अग्रभाग चोखने यास 'ओष्टविमृष्ट चुंबन' म्हणतात. तर हाच प्रकार वेगाने केल्यास त्यास 'विचुम्बितक चुंबन' म्हणतात.

१७. आद्रचुम्बित आणि संपुटक चुंबन

ओठावर दंतक्षत करुन त्या ओठांना चोखण्याच्या प्रकाराला 'आद्रचुम्बित' तर स्त्री व पुरुष ओठांचे पुर्णपणे आमोरा समोर चुंबन घेत असतील तर त्यास संपुटक चुंबन म्हणतात.

१८. उत्तरोष्ठ चुंबन

नायक नायिकेचे अधर (खालचे ओठ ) चुंबन करतांना नायिका जर त्याच वेळी नायकाच्या वरच्या (उत्तरोष्ठ) ओठांचे चुंबन घेत असल्यास त्यास 'उत्तरोष्ठ' चुंबन म्हणतात, असे मत महर्षी वात्सायन यांनी कामसूत्र मध्ये दिले आहे. 

या उत्तरोष्ठ चुंबनात पतीला जर मिशा नसतील तर ह्या चुबनात आनंद निर्माण होऊ शकतो अन्यथा नाही. उलट नायकाला नायिकेचे उत्तरोष्ठ चुंबन घेणे सहज शक्य आहे.
१९. छाया चुंबन

आरसा, भिंत किंवा पाण्यात पडलेले किंवा दिसणाऱ्या प्रतिबिंबाचे दोघांपैकी कोणीही चुंबन घेत असेल तर त्यास 'छाया चुंबन' म्हणतात. या छाया चुंबनाचा बराच परिणाम साहित्यावर दिसतो. बिहारीच्या सत्तसई मध्ये त्यांची नायिका घुंघट-पट मधून हिंमतीने नायकाकडे पहाते व त्याच्या सवलीला स्पर्श करुन अनुरागही प्रकट करते. ते म्हणतात,

“चितई ललचौहे चखनु, डटि घुँघट-पट माँहि । 
छल सौं चली छुवाई कै, छिनकु छबीली छाँहि ।। 
(छंद. १२)

याच प्रमाणे इतरही उदाहरण देता येतील जे कविने कामशास्त्रातून घेतलेली आहेत.

"ययौ न को ऽ पि क्षममास्यमेलितं जलस्य गण्डूषमुदीतसंमद : ।
चुचुम्ब तत्र प्रतिबिम्बितं मुखं
पुर: स्फुरन्त्याः स्मरकार्मुकभ्रुव: ।।
(नैषधीयचरित्र १६/६६)

कामदेवाच्या धनुष्या प्रमाणे बाहू असणारी कोण्या अपूर्व सुंदरीचे मुख नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित होत होते. त्याला पाहून, कोणी युवक आनंदात मग्न झाला आणि त्या प्रतिबिंबाचेच चंबन घ्यायला लागला. हे कामशास्त्रात सांगितलेले छाया चुंबन होय. 

२०. संक्रांत चुंबन

कडेवरील लहान मुलाचे, फोटोचे किंवा माती, दगड वा काठी पासून तयार केलेल्या प्रतिमांचे चुंबन किंवा अलिंगण देणे, कारण ज्याचे चुंबन घ्यावयाचे आहे, ते शक्य नसल्याने अशा प्रतिमा वापरल्या गेल्याच्या आरोपा मुळेच अर्थात त्या प्रतिमांवर याची किंवा हिची संक्रांत आली अशा आशयाने यास 'संक्रान्त' चुंबन असे नाव देण्यात आले. छाया व संक्रांत हे दोन्ही चुंबन परिस्थितीवर अवलंबून आहेत. या संदर्भात बिहारीचा दोहा पाहण्यासारखा आहे.

" विहॅसि बुलाय विलोक डत, प्रौढ तिया रस धूमि ।
पुलकि पसीजति पूतको, पिय चूम्यो मुख चूमि ।।"

प्रिय पतीने कडेवरील मुलाचे चुंबन घेतले. हे पाहून कोण्या दक्ष किंवा प्रविण असलेलीस स्वतःची आठवण आली, हृदयात काम जागृत झाला. ज्यामुळे सात्विक भाव निर्माण होऊन पुलकित झाली व शरीरावर घाम आला. यानंतर ती पतीने चुंबन घेतलेल्या बालकाचे सारखे सारखे चुंबन घ्यायला लागली. हे संक्रान्त चुंबन होय. यात मुलाचे लाडाने चुंबन नसून पती / प्रियकर याच्या आठवणीत घेतलेले अर्थात काम भाव उत्पन्न झाल्याने घेतलेले चुंबन होय.
२१. हस्तांगुलि, पादांगुलि व उरु चुंबन

हाताच्या बोटाने नायक व नायिकांचे एकमेकास स्पर्श करणे यास 'हस्तांगुलि चुंबन' म्हणतात. हे चुबन सर्व लोकांमध्ये बसल्यानंतर करता येते. म्हणजे काही तरी निमित्य करुन नायक नायिका परस्पर बोटांनी एक दुसऱ्याच्या शरीराला स्पर्श करणे यास 'हस्तागुलि चुंबन' म्हटले आहे. बऱ्याच लोकांच्या मध्ये बसलेले असतांना नायक व नायिका पायाच्या बोटानी एकमेकांना स्पर्श केल्यास त्यास 'पादांगुलि चुंबन' म्हणतात. तर झोपेत असलेल्या नायिकेच्या जंघाचे चुंबन घेऊन तिच्यात प्रेमभाव जागृत करण्याला 'उरु चुबन' असे म्हणतात. 

२२. समस्तक केशपाशग्रह चुंबन

आचार्य दीक्षित सामराजने बाहय समागमात केस पकडणे, कुरवाळणे, त्याना हळुवार ओढणे यास प्रामुख्याने स्थान दिलेले असून केसांसोबत चाळा करतांना घेतलेल्या चुंबनाला केशपाशग्रह चुंबन म्हणतांना असे जर कोणी कामातूर व्यक्ती स्त्रीच्या मस्तकाला धरून दोन्ही हातानी तिचे केस कुरवाळत मुखाचे चुंबन घेत असल्यास त्यास 'समस्तक केशपाशग्रह चुंबन' समजावे.

२३. घट्टन चुंबन

बोट व अंगठ्याने नायिकेचे ओठ गोल करून त्यावरुन जीभ फिरविणे म्हणजे 'घट्टन चुबन' होय.

२४. व्दिजाग्रहण चुंबन

बोट व अंगठ्याच्या साह्याने नायिकेचे अधरोष्ठ (खालचे ओठ) बाहेर ओढून दंतक्षत न करता जोरदार चुंबन घेऊन पीडा (कष्ट) दिल्यास त्यास 'व्दिजाग्रहण चुंबन' समजावे.
२५. चूषण चुंबन

कामपिडीत स्त्री पुरुष तोंडात तोड देवून एकमेकाच्या ओठाचे रसग्रहण करीत (चोखत) असतील तर त्यास 'चूषण चुबन' म्हणतात.

२६. अधर चुंबन

केवळ खालचा ओठ आपल्या ओठानी धरुन दाबल्यास त्या प्रकारास 'अधर चुंबन' म्हणतात.

२७. अनुवदन चुंबन

उभयतांनी आपल्या जिभा आळीपाळीने एकमेकाच्या मुखातुन फिरविल्या तर त्या क्रियेस 'अनुवदन चुबन' म्हणतात.

२८. अभ्यर्थित चुंबन

प्रियकर प्रेयसी पैकी एकाने दुसऱ्याचे दोन्ही ओठ खूप जोराने दाबून मनसोक्त चुंबन घेतल्यास त्यास 'अभ्यर्थित चुंबन' म्हणतात.
२९. अन्वर्थक चुंबन

कपाळ व गाल वगैरेंचा चुंबन घेताना आवाज होईल अशा तऱ्हेने जोराने चुंबन घेतल्यास त्यास 'अन्वर्थक चुंबन' असे नाव दिलेले आहे.

वरील चारही चुंबनाचे प्रकार रतिरहस्य या ग्रंथात दिलेले आहेत. 

या चुंबनाच्या व ओठ चोखण्याच्या प्रकाराला साहित्यकारानी कुठल्याकुठे नेलेले दिसते. बिहारी म्हणतात की, 

"सुदुति दुराई दुरति नहिं, प्रकट करति रतिरुप । 
छुटे पीक औरे उठी, लाली ओठ अनूप ।। " 
(बिहारी सतसई ९६)

चांगली चमक लपविता लपत नाही ती तर रंगरंगेली प्रकट केल्याशिवाय सोडणार नाही. पहा ना; पान चावल्यामुळे त्याच्या पानाच्या पिकची लाली ओठांवर आली होती, ती तर निघून गेली. आता तर वेगळीच लाली उठून दिसते. सांग तर खरे यास कसे लपवशील. यास तर असे म्हणू की, कोणीतरी चांगलेच ओठ चोखले आहेत. ज्यामुळे हे लाल झाले आहेत. यात कामशास्त्रात सांगितलेल्या चुंबनाचेच प्रतिबिंब दिसते.

साधारणतः समागम हे प्रेम आणि भुक या दोन मानसिक वृत्तीवर अवलंबून असते. प्रेम उदार व भावुक असते. तर वासनेची भूक ही स्वार्थी असते अधिकांश लोक असे समजतात की, दाम्पत्य जीवनातील या क्रियाना कामशास्त्रा‌द्वारे माहित करुन घेण्याची गरज नाही. कारण निसर्ग सर्व काही स्वतः शिकवितो. असा विचार करणारे तारुण्याचे दिवस सरताच दुखी व निराश दिसतात. त्याचे दाम्पत्य जीवन निरस होऊन जाते. पती व पत्नीच्या स्वभावात चिडचिडेपण यायला लागतो. केव्हा केव्हा तर एक दुसऱ्याच्या बाबतीत अविश्वासाचे वातावरण निर्माण होते आणि कामशास्त्र याच विकृत अवस्थे पासून मानवाला सुरक्षित ठेवण्याचे कार्य करीत असते. प्राचीन कामशास्त्राच्या अनुषंगाने पाहता आजचे आधुनिक वैद्यक शास्त्रात सुध्दा चुंबन क्रियेमुळे मानवी शरीरात पाच प्रकारचे बदल होतात असे संशोधनाअंती सांगितले आहे.

1) आपल्या जोडीदाराला विश्वासात घेत आनंदी, प्रेमळ वातावरण निर्माण करण्यासाठी दम्पती चुंबन (Couple Kiss) करण्याला जास्त महत्व देतात. चुंबन केल्याने तणाव दूर होतो. तसेच आराम मिळतो. मेंदूवरील ताण (Stress) खूप कमी होतो. विशेष म्हणजे चुंबना मुळे तुमच्या मेंदू मधील काम भावनेला चालना मिळते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते.

2) आपल्या चेहऱ्यावरील (Face) 34 मांसपेशी आणि 112 पोश्चर स्नायू चुंबन केल्याने सक्रीय होतात. बराच वेळ चुंबन केल्याने आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही. त्वचेवरील स्नायू चुंबन केल्याने घट्ट होतात.

3) आवेगाने चुंबन घेतल्याने स्नायूमधील ताण कमी होतो आणि त्वचा गुळगुळीत होते. त्याचबरोबर रक्ताभिसरण वाढवते. शरिरातील ऑर्बिक्युलरिस ओरिस स्नायू ओठांना चुंबन करण्यासाठी सक्रीय करतो.

4) तुम्हाला हे माहितेय का? की आपण आयुष्यात 20,000 मिनिटाहून अधिक वेळ पर्यंत चुंबन घेऊ शकतो, चुंबना मुळे प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते आणि त्याच्यातील अतिसंवेदनशीलता कमी करण्यासाठी चुंबन फायद्याचे ठरते.

5) बराच वेळ चुंबन केल्याने तुमचे ओठ, जीभ, गाल, चेहरा, जबडा आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्याच्या स्नायूंचे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चुंबन केल्याने तुम्ही आणखी तरुण, बळकट आणि अधिक आनंदी दिसू शकाल.

6) चुंबन घेण्याने मेंदूत औक्सिटौसिन तयार होतं. त्याच्यामुळे प्रेम आणि सुरक्षिततेची भावना तयार होते.
चुंबन घेण्याने होणारे संभाव्य धोके - 

जास्त वेळा चुंबन घेण्यामुळे ओठांवर जखमा आणि चट्टे उठू शकतात, त्याला हार्पिज म्हणतात. काही आजार असल्यास लाळेतून तो दुसऱ्याकडे संक्रमित होऊ शकतो. जसे की ताप, श्वसनमार्गाचे रोग, मेनिंजायटिस, फ्लू, टी.बी., हिपेटायटीस सारख्या रोगांना निमंत्रण देऊ शकतं.

चुंबन आणि सामजिक भय - 

८ व्या पोपच्या उजव्या हाताचे चुंबन घेण्याची प्रथा होती. या संदर्भाने अशी कथा सांगितली जाते की, एकदा पोपच्या अंगठ्याचे स्त्रीने वासनेने प्रेरित होऊन चुंबन घेतले गेले. तेव्हा पोपने पापच्या भीतीने स्वतःचा अंगठा कापून टाकला. कदाचित तो सामाजिक भयापोटी घेतलेला निर्णय असावा.

सध्या पाश्चात्य संस्कृतीत चुंबनाचा प्रभाव सहज दिसून येतो. तिथे विकृतीकरण झालेले आढळून येत नाही. एकमेकांना भेटल्यावर हलकेसे चुंबन घेणे हे सहज आहे.
वैयक्तिक नात्यात एकाची बडबड थांबवायची असेल तर दुसऱ्याने चुंबन घेणे यातून राग ही शांत होतो. तसेच प्रेमभाव ही वाढतो पण हे काळ आणि वेळ सापेक्ष असते.
आपल्या कडे प्रस्तुत विषयावर बोलणे, लिहणे आजही या सभ्य मानले जात नाही. मला कित्येकांनी प्रत्यक्ष भेटून किंवा भ्रमणध्वनी द्वारे असे सांगितले आहे की, सर आपण खूप छान लिहलेले आहे. पण मी सर्व वाचून ही लाईक केले नाही. अर्थात सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडिया वर लाईक केल्यास इतर काय म्हणतील ही भीती कायम आहे. असे जर शिकलेले व्यक्ती म्हणत असतील तर तिथे स्त्रियांची काय अवस्था असेल हे विचार करून अंगावर काटा येतो. ब्रिटिश भारतात आले तेव्हा कामसूत्र ग्रंथाचे भाषांतर केलेल्या ग्रंथावर बंदी आणली होती. हे म्हणजे तसले काही तरी किंवा अभद्र अशी अवहेलना केली गेली होती. मला वाटते आपण या मानसिकतेतून अजूनही बाहेर पडलेले नाही आहोत. 
माझ्या पोस्ट वर काही मित्रांनी अशाही प्रतिक्रिया दिल्या की आपण देवांचे फोटो चुंबन या विषयावर ठेऊ नयेत. मित्र - मैत्रिणींनो, ज्या निर्मिकाने आम्हाला निर्माण केले, ज्याने आम्हाला काम जीवन बहाल केले त्यांनी या बाबी कधीही वर्ज मानल्या नाहीत. अगदी मध्ययुगात ही मधुरा भक्ती काळात जे लिखाण झाले. त्यामध्ये ईश्वर आणि भक्त यांचे नाते सांगण्यासाठी इश्र्वरास आपला प्रियकर तर स्वतःला त्याची प्रेमिका समजून काव्य निर्मिती झाली आहे. जगात हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे. जो मानवाला उपयुक्त असलेल्या सर्व गोष्टींची पूजा करण्याचे स्वतंत्र देतो. त्यातूनच लिंग पूजा, योनी पूजा, रज पूजा अस्तित्वात आली. रजस्वला स्त्रीस आजही मंदिर प्रवेश करू नये ही धारणा आहे. कदाचित तिला आराम मिळावा ही वैज्ञानिक भूमिका ही असेल. पण कामाख्या मंदिर हे ही भारतात आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. वेदात इंद्र इंद्राणी संवाद सुक्त, यम यमी संवाद सुक्त, स्वनय रोमशा संवाद सुक्त असे कितीतरी उदाहरण देता येतील ज्यात कामभावना प्रकट झालेली आहे. कालिदासाने कुमारसंभव यात शिव पार्वती समागम कसे झाले याचे सुंदर वर्णन केलेले आहे. कामदहन हे शिवपार्वती समागम घडावा या साठीचा प्रयत्न होता. हे विसरता कामा नये. तारकासुर याचा वध करण्यासाठी शिव पुत्राने जन्म घेणे गरजेचे होते. काम प्रेरणेतून आमची दैवते दूर राहिलेले नाहीत. नव्हे काम शास्त्र शिवाने पार्वतीस सांगितले ते नंदीने ऐकले त्यातूनच पुढे कामसूत्र ग्रंथ लिहला असल्याचे वात्सायन म्हणतात. म्हणजे कामशास्त्राचे श्रेय ही देवतांना दिले आहे. असो ज्यांनी देवतांचे फोटो शेअर करू नये असे सुचविले त्यांचे ही आभार ज्या मुळे या विषयावर मला आणखीन अभ्यास करण्यास प्रेरणा मिळाली. तसेच मला वैयक्तिक मेसेज करून छान लिहिता असे म्हणणाऱ्यांचे ही आभार कारण भारतीय मानसिकता अजून बदललेली नाही. हे लक्षात घेऊन जरा वेगळ्या पध्दतीने लिखाण करण्याची गरज असल्याची जाणीव झाली.

शेवटी एक नक्की की, चुंबनाच्या माध्यमातून स्पर्श, स्वाद आणि गंध यांची देवाण घेवाण होत असते. या सोबतच भावनात्मक स्तरावर चुंबन घेतले गेले असल्यास ते ओझरते जरी असले तरी त्याचे पडसाद आयुष्यभर सोबत असतात. त्यात स्पर्श, स्वाद आणि गंध शिल्लक नसला तरी त्यातून मिळालेल्या आनंदलहरी कायम स्मरणात राहतात. एव्हढेच नव्हे तर त्या प्रकर्षाने जाणवत ही राहतात.

इति चुंबन पुराणे सुफळसंपूर्णम्...

डॉ अरविंद सोनटक्के
कामशास्त्र आणि मूर्ती शास्त्र अभ्यासक
नांदेड : 9423139676

फोटो नेट वरून साभार
संदर्भ ग्रंथकर्त्याचे आभार 🙏🏻
कामसूत्र
रतिरहस्य
पंचसायक
अनंगरंग
रतिशास्त्र
रतिरत्नप्रदीपिका
रतिकल्लोलिनी
बाभ्रव्याकरिका
कंदर्पचुदामनी
नागरसर्वस्वम्
शृंगाररसप्रबंधदीपिका
हिंदू धर्म आणि तत्वज्ञान (डांगे)
बिहारी सत्तसई
नैषधीयचरित्र 
दै. सकाळ 21/12/2021
गृहशोभिका Oct. 2016

Comments

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा