पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.
उजनीच्या अथांग जलाशयाखाली एक अमूल्य रत्न दडलेले आहे… पलसदेवचे विष्णु मंदिर!
येथे केवळ शिल्पकला नाही, तर रामायणाच्या कथा दगडांमध्ये जिवंत झालेल्या दिसतात.
उजनी धरणाच्या जलाशयाच्या मध्यभागी दडलेले पलसदेवचे शिव मंदिर आहे. त्याच्या बाजूला थोड्या उंचीवर एक मंदिर दृष्टीस पडते. पावसाळ्यानंतर इथे सहज जाता येते. परंतु पसळदेव हे शिव मंदिर पाहण्यासाठी उन्हाळ्यात पाणी पातळी खाली गेल्याशिवाय जाणे शक्य नाही. किनाऱ्यावरील ज्या मंदिरास विष्णु मंदिर (?) म्हणून ओळखले जाते ते मंदिर इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म यांचे अद्भुत संमेलन असून हे मंदिर द्विदल आहे. या मंदिराची मांडणी उंच जगती / जोत्यावर आहे. सभामंडप, मुखमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर प्राचीन कारागिरीचे जिवंत उदाहरण आहे.
मंदिरातील उपगर्भगृह दक्षिणाभिमुख असून ते भैरवाला समर्पित असावे, असे संशोधकांचे मत आहे. येथे भैरवाची एक प्रतिमा दिसून येते. चार स्तंभांवर आधारलेला सभामंडप व रिकामे देवकोष्ठ या वास्तूशैलीला अधिक गंभीर बनवता. मंदिराच्या दाराशी उभे राहिले तरी त्याचे प्राचीन वैभव स्पष्ट दिसते.
पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिर विशेष आकर्षक आहे कारण याच्या बाह्य भिंतीवर रामायणातील प्रसंग दगडात कोरलेले आहेत. रामायणाच्या कथा – राम-सीता वनवास, सुवर्णमृग, रावणाकडून सीतेचे अपहरण प्रसंग, हनुमानाचे लंकेला उड्डाण, लंका दहन – या सर्व शिल्परचना मंदिराला जणू एक भव्य चित्रकाव्य बनवतात. या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे पलसदेवचे विष्णु मंदिर केवळ धार्मिक स्थळ राहिलेले नाही, तर ते मध्ययुगीन शिल्पकला आणि मंदिर स्थापत्याचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. उजनी धरणाचे पाणी ओसरल्यानंतर या मंदिराचा आस्वाद घेणे ही प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी अनुभूती ठरते.
पलसदेवला भेट देताना तुम्ही केवळ एक प्राचीन मंदिर पाहत नाही, तर शिल्परूपात जिवंत झालेल्या रामायणाच्या कथा अनुभवता. उजनीच्या जलाशयाच्या शांत वातावरणात ही सफर तुमच्या मनावर कायमची छाप सोडेल. या जलाशयाने एकूण चार मंदिर आपल्या कवेत घेतलेली आहेत.
पुण्यापासून अवघे १२५ कि.मी. आणि इंदापूरपासून २१ कि.मी. अंतरावर असलेले पलसदेव हे गाव एकेकाळी प्राचीन मंदिरांमुळे प्रसिद्ध होते. १९८० मध्ये भीमा नदीवर उजनी धरण बांधल्यानंतर हे गाव जलमग्न झाले, पण सरदेश्वर, पलसनाथ (पळसदेव), काशी-विश्वनाथ आणि विष्णु (?) ही मंदिरे आजही पाण्याखाली दडून भूतकाळाची साक्ष देत उभी आहेत.
प्राचीन काळी या गावाला ‘रत्नपूर’ असे म्हटले जात असे. नव्या पलसदेव गावाजवळून उजनी धरणाचा अथांग विस्तार दिसतो. पाण्याखाली गेलेल्या पलसनाथ मंदिराचे शिखर दूरवरून उठून दिसते, तर भग्नावस्थेतले, शिखरहीन विष्णु (?) मंदिर आजही अभ्यागतांना भूतकाळाच्या साक्षीदारासारखे भुरळ घालते.
इतिहास, धर्म, कला आणि स्थापत्यशास्त्र यांचा संगम असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरते. उजनीचे पाणी ओसरल्यानंतर या मंदिराला भेट देणे म्हणजे मध्ययुगीन कलावैभवात डोकावण्याची आणि रामायणकथेचे दगडात जिवंत दर्शन घेण्याची अप्रतिम संधी होय.
आज दसऱ्याच्या दिवशी, जेव्हा रामाने रावणाचा पराभव करून धर्माचा विजय घडविला, त्याच रामायणातील कथा येथे शिल्पांच्या माध्यमातून जिवंत झाल्या आहेत, ही बाब अनोखी आणि प्रेरणादायी आहे. धर्म आणि न्यायाच्या विजयाची आठवण करून देणारे हे शिल्पसमूह फक्त एक धार्मिक स्मारक नसून, पर्यटकांसाठी इतिहास, कला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम आहे.
दगडावर कोरलेल्या या कलाकृतींमध्ये कलाकारांची सूक्ष्मता, भावदर्शन आणि कलात्मकता दिसून येते.
वाली सुग्रीव संघर्ष पाहताना मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि लक्ष्मण, मध्यभागी हनुमान आणि वाली सुग्रीव संघर्ष शिल्प
पळसदेव/ पळसनाथ शिव मंदिर
फोटो स्रोत _ गुगल वरून साभार
Comments
Post a Comment