मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा


मातृत्व ही केवळ निसर्गाची देणगी नसून ती सृष्टीतील सर्वात कोमल, पवित्र आणि निःस्वार्थ भावना आहे. आईच्या कुशीतूनच माणूस प्रथम प्रेम, सुरक्षितता आणि जिव्हाळा अनुभवतो. म्हणूनच भारतीय शिल्पकलेत मातृभावाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
धारासूर येथील गुप्तेश्वर शिव मंदिर येथे कोरलेले हे “मातृशिल्प” त्या वात्सल्यभावनेचे अत्यंत जिवंत आणि दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. दगडामध्ये साकारलेले हे शिल्प पाहताना कलाकाराने केवळ शरीर कोरले नाही, तर भावनांनाही श्वास दिला आहे, याची प्रचिती येते.
या शिल्पात माता आपल्या बालकाला प्रेमाने कुशीत घेत आहे. तिच्या हातातील अलगद स्पर्श, बाळाला धरून ठेवण्याची सुरक्षितता आणि चेहऱ्यावर उमटलेला वात्सल्यपूर्ण भाव अत्यंत प्रभावी आहे. परंतु या शिल्पातील सर्वात विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे माता बाळाच्या ओठांचे चुंबन घेताना दाखवलेली आहे. भारतीय मंदिरशिल्प परंपरेत माता-बालक दृश्ये अनेक ठिकाणी दिसतात, परंतु अशा प्रकारचा “लिप-किस” अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे हे शिल्प केवळ कलात्मक नसून भावविश्वाच्या अभिव्यक्तीचेही अद्वितीय उदाहरण ठरते.
या दृश्यात कोणताही दिखाऊपणा नाही; उलट निरागस प्रेमाची सहज अभिव्यक्ती आहे. आई आणि बाळ यांच्यातील नात्याची जी आत्मीयता शब्दांत व्यक्त करणे कठीण असते, ती कलाकाराने दगडात पकडली आहे. बाळाच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि आईच्या ओठांमधून व्यक्त होणारा जिव्हाळा पाहताना शिल्प जणू सजीव भासते.
शिल्पाच्या देहबांध्यातही तत्कालीन कलाशैलीची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. अलंकारांची सूक्ष्म मांडणी, केशरचना, कटीप्रदेशावरील दागिने, शरीराची लयबद्ध ठेवण आणि स्तंभालगत उभी असलेली त्रिभंग मुद्रा यामुळे हे शिल्प सौंदर्य आणि भाव यांचा सुंदर संगम घडवते. कलाकाराने मातृत्वाला केवळ धार्मिक किंवा लौकिक रूपात न पाहता, मानवी संवेदनांचा सर्वोच्च आविष्कार म्हणून साकारले आहे.
आजच्या मदर्स डेच्या निमित्ताने हे शिल्प आपल्याला स्मरण करून देते की, काळ बदलला, संस्कृती बदलल्या, जीवनशैली बदलली तरी आईचे प्रेम मात्र शाश्वत आहे. हजारो वर्षांपूर्वी दगडावर उमटलेली ही वात्सल्याची मुद्रा आजही तितकीच जिवंत आणि स्पर्शून जाणारी वाटते.
आई म्हणजे सृष्टीतील पहिला देव, पहिली गुरू आणि पहिला प्रेमस्पर्श. धारासूरच्या या शिल्पातील तो चुंबनस्पर्श म्हणजे मातृत्वाच्या अनंत प्रेमाचा शिलालेखच आहे.

मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शिल्प शुभेच्छा!
💐💐💐

Comments

  1. खुप सुंदर विवेचन सर 🌷🌹🎊👍👌🙏

    ReplyDelete
  2. अत्यंत सारगर्भित आणि सुंदर विवेचन. मातृदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. Thanks for highlighting rareness of the art.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार